मुंबई - कोरोनामुळे उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या काळात अनेकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले आहे. पण अशा काळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घर बसल्या ३ कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावली आहे.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या जगातील १० खेळाडूंमध्ये विराट कोहली एकमेव भारतीय आहे. लॉकडाऊनच्या काळात जगातील प्रसिद्ध खेळाडूंनी स्पॉन्सर बेस इन्स्टाग्राम पोस्ट करत मोठी कमाई केली. यात विराटचेही नाव आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या टॉप-१० खेळाडूंमध्ये विराट सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने १२ मार्च ते १४ मे या दरम्यान, घरबसल्या ३ कोटी ७९ लाखांची कमाई केली. यात त्याने, त्याच्या इन्साग्राम अकाऊंटवरुन तीन ब्रँडच्या पोस्ट केल्या. यासाठी त्याने प्रत्येक पोस्टसाठी १.२ कोटी रुपये घेतले आहेत.
टॉप-१० खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानावर पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याने लॉकडाउन काळात तब्बल १७.९ कोटींची कमाई केली आहे. रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर २२ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डोच अव्वल आहे.
रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी आणि अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्याने या काळात १२.३ तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारने अवघ्या ४ पोस्ट करत ११ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या व्यतिरीक्त या यादीत एनबीए स्टार शकील ओनील, इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम हे खेळाडूही आहेत.
हेही वाचा - भज्जीची नवी इनिंग, 'फ्रेंडशिप' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण
हेही वाचा - जातीवाचक शेरेबाजी प्रकरण : पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर युवराज म्हणाला...