मुंबई - जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत भारताचा विजयी रथ न्यूझीलंडने रोखला आणि एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही किवींनी भारताला व्हाईटवॉश दिला. विराट कोहली या दौऱ्यात सपशेल फेल ठरला. यामुळे विराटच्या कामगिरीवर सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देव यांनी सांगितले की, 'विराटने आता तिशी ओलांडली आहे. वयाचा परिणाम तुमच्या खेळावर होत असतो. तसाच तो तुमच्या नजरेच्या क्षमतांवरही होत असतो. आधी विराट इन स्विंग चेंडू फ्लिक करायचा. ही त्याची ताकत होती. पण अशाच चेंडूवर तो दोन वेळा बाद झाला. मला वाटते त्याने आय साइडबाबत थोडी काळजी घेतली पाहिजे.'
पुढे बोलताना देव यांनी सांगितले की, 'जेव्हा टप्पा पडून आत येणाऱ्या चेंडूवर मोठे फलंदाज त्रिफळाचीत किंवा पायचीत व्हायला लागतात. त्यावेळी माझ्या मते त्यांना अधिक सराव हा एकच पर्याय उरतो. १८ ते २४ वर्षापर्यंत आय साइड सर्वोत्तम असते. मात्र काही काळाने त्यावर परिणाम होतो. ती सर्वोत्तम राहण्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागते. अन्यथा हाच तुमचा कच्चा दुवा ठरतो.'
दरम्यान, विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यात फक्त २१८ धावा करता आल्या आहेत. त्याला दोन कसोटी सामन्यातील चारही डावांत २० पेक्षा जास्त धावसंख्या ओलांडता आली नव्हती.
हेही वाचा - कोरोनाची दहशत : इंग्लंडचे खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवणार नाहीत
हेही वाचा - उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर इंग्लंडचे आव्हान, 'त्या' पराभवाचे उट्टे काढण्याची संधी