लंडन - भारतीय संघाचा विश्वकरंडकातील पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सराव करताना विराट कोहली जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली आहे.
विराट जखमी झाल्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार केले. त्यांनी विराटच्या अंगठ्यावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहली सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. मात्र, यानंतर अजूनपर्यंत संघ व्यवस्थापनातर्फे कोहलीच्या दुखापतीबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
बीसीसीआयकडून अद्याप दुजोरा नाही
सराव करताना विराट नेमका कशामुळे जखमी झाला, हे समजू शकले नाही. तो क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला की फलंदाजी करताना याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.