दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला दंड आकारण्यात आला आहे. बंगळुरूचा संघ क्षेत्ररक्षण करताना षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी विराटला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियामानुसार, आरसीबीच्या संघाची ही पहिली चूक होती. त्यामुळे कर्णधार विराटला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.
गुरुवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ३ गडी गमावून २०६ धावा केल्या. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावांची खेळी केली होती. पंजाबचा डाव एक तास ५० मिनिटांपेक्षा अधिक काळ सुरू होता.
या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने राहुलचा ८३ आणि ८९ या धावांवर दोन वेळा झेल सोडला. पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकांत १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. बंगळुरूचा संघ आपला पुढील सामना सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे, पंजाबला रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे.