पुणे - इंग्लंडविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची नजर आता एकदिवसीय मालिकेवर आहे. पुणे येथे उद्यापासून (ता.२३) सुरू होणाऱ्या उभय संघातील मालिकेत, भारतीय संघाकडून सलामीला कोण उतरणार, याचा खुलासा कर्णधार विराट कोहलीने केला आहे.
टी-२० मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या निर्णायक सामन्यात विराट रोहितसोबत सलामीला उतरला होता. यामुळे एकदिवसीय मालिकेत देखील तो सलामीला येणार का? याची चर्चा रंगली आहे. या चर्चेला आता विराटच्या स्पष्टीकरणानंतर पूर्णविराम मिळाला आहे.
एकदिवसीय मालिकेआधी झालेल्या वर्चुअल पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, 'एकदिवसीय मालिकेत रोहित सोबत शिखर धवन सलामीला येईल. कारण, एकदिवसीय प्रकारातील चांगल्या सलामी जोडींमध्ये ही जोडी देखील आहे. शिखर पहिल्या टी-२० सामन्यानंतर संघाबाहेर आहे. कारण, भारताने युवा खेळाडूंना या मालिकेत संधी दिली होती.'
शिखर आणि रोहित निश्चितपणे या प्रकारात सलामीला येतील. यात कोणतीही शंका नाही. मागील काही वर्षांत या दोघांनी चांगली सलामी दिली आहे, असे देखील विराट म्हणाला.
टी-२० प्रकारात सलामीबाबत विराटला त्याची भूमिका विचारल्यानंतर तो म्हणाला, 'सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूंना टॉप ऑर्डरमध्ये फिट करण्यासाठी मी सलामीला खेळत राहिन.'
रोहितने सांगितल्याप्रमाणे, आम्ही रणणिती आखत सलामीचा निर्णय घेतला. दोघांनी सोबत फलंदाजी करण्याचा आनंद घेतला. यातून आम्ही एक चाचपणी केली. पण याची खात्री नाही की, हे पुढे देखील कायम राहिल. मी सर्व उपलब्धतेची चाचपणी करण्यासाठी आयपीएलमध्ये सलामीला येणार आहे. सूर्यकुमारसारख्या खेळाडूला वरच्या फळीत संधी मिळाली यासाठी मी आता सलामीवीरच्या भूमिकेत स्वत:ला प्रमोट करत आहे. संघाच्या आवश्यकेनुसार मला कोणतीही भूमिका निभावण्यास सक्षम राहिलं पाहिजे. आपण आता विश्वकरंडक स्पर्धेच्या जवळ आहोत, असे देखील विराट सांगितले.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर विराटने सलग तीन सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने पाच सामन्यात १४७.१३ च्या स्ट्राइक रेटने २३१ धावा केल्या. या कामगिरीमुळेच विराटला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर पडल्यास.., 'या' ३ गोलंदाजांवर असेल राजस्थानची नजर
हेही वाचा - 'सूर्यकुमारमुळे विराटला सलामीला येण्याची संधी मिळाली'