लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला १ मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे. आणि त्यासाठी त्याला अवघ्या ३७ धावांची आवश्यकता आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पूर्ण करण्याची संधी विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात असणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर तिन्ही प्रकारात मिळून १९ हजार ९६३ धावा असून २० हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला फक्त ३७ धावांची गरज आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ ९ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघाना पराभवाची धूळ चारली आहे.तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भारताच्या खात्यात ५ सामन्यानंतर ९ गुण जमा आहेत.