दुबई - आयसीसीने टी-२० रॅकिंग जाहीर केली आहे. या नव्या आकडेवारीनुसार, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांना बढती मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या टी-२० मध्ये कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. यामुळे त्याला एक स्थानाची बढत मिळाली आहे आणि यासह त्याने फलंदाजांच्या यादीत ११ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
दुसरीकडे, धवनने दुसऱ्या सामन्यात ४० आणि तिसऱ्या सामन्यामध्ये ३६ धावा करत तीन स्थानाची झेप घेत १३ व्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-२० मालिकेत रोहितची चांगली कामगिरी राहिली नाही. मात्र, नव्या रॅकिंगनुसार, रोहित ८ व्या स्थानावर विराजमान आहे. याच स्थानावर इंग्लंडच्या अलेक्स हेल्स हा देखील विराजमान आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वलस्थानी आहे.
गोलंदाजांच्या यादीमध्ये फिरकीपटू तबरेझ शम्सी याने पहिल्यांदा पहिल्या टॉप २० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे, तर एंडिले फेलुक्वायोने करिअर-बेस्ट सातवे स्थान मिळवले आहे. दरम्यान, गोलंदाजाच्या यादीत अफगाणिस्तानचा युवा कर्णधार राशिद खान ७५७ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. यानंतर पाकिस्तानचे इमाद वशीम आणि शादाब खान हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा - टी-२० मध्ये सलग १८ चेंडू निर्धाव; दीप्तीचा भन्नाट स्पेल, ४ षटके, ३ निर्धाव आणि ३ गडी बाद
हेही वाचा - १५ वर्षाच्या शफालीने केला टी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम