बंगळुरू - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बेशिस्त वर्तनाबद्दल कारवाईला सामारे जावे लागले आहे. आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात विराटने एक चूक केली होती. त्याचा फटका विराटला बसला आहे.
हेही वाचा - GREAT!..रोनाल्डोला पछाडत मेस्सी ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू
बंगळुरू येथे झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात विराटने आफ्रिकेचा गोलंदाज ब्युरन हेंड्रिग्जला धक्का दिला. सामन्याच्या पाचव्या षटकात हा प्रकार घडला होता. त्यामुळे आयसीसीकडून कोहलीस ताकीद देण्यात आली आहे. शिवाय त्याच्या नावावर एक पेनल्टी (डीमेरीट) गुणही देण्यात आला आहे.
विराटला आत्तापर्यंत असे तीन गुण मिळाले आहेत. याअगोदर, आफ्रिकेविरुद्ध त्याला पहिला डीमेरीट गुण मिळाला होता. त्यानंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याला असाच एक गुण मिळाला होता.
कर्णधार क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून विजय मिळवला. या पराभवाबरोबर भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. भारताने दिलेले १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने १७ षटकात सहज पूर्ण केले. डी-कॉकने नाबाद ७९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
आफ्रिकेचे सलामीवीर डी-कॉक आणि रीझा हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या गडीसाठी ७६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांचा समाचार दोघांनी घेतला. हेंड्रिग्ज हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर २८ धावांवर बाद झाला. यानंतर डी-कॉक आणि टेंम्बा बावुमा याने संघाला एकतर्फी विजय मिळवला.