मुंबई - बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या मातब्बर क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आली नाही. मात्र, निवड समितीने यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी भरीव कामगिरी करणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर विश्वास दाखवला. वरुणची भारताच्या टी-२० संघात निवड झाली आहे.
बिदरमध्ये जन्मलेल्या वरुणने यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची भंबेरी उडवत पाच विकेट्स घेतल्या. यंदाच्या मोसमात वरुण कोलकाताचा महत्त्वाचा गोलंदाज ठरला. संघाला बळींची गरज असताना वरुण धावून आला आहे. सुनील नरिनसारखा मातब्बर गोलंदाज संघाबाहेर बसल्यानंतर वरुणने फिरकीची मदार सांभाळली.
लिस्ट-ए पदार्पण -
वरुणने २०१८-१९मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मोसमात तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ९ सामन्यांत 22 बळी घेतले होते.
आर्किटेक्टची पदवी -
वरुणने सुरुवातीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये पाय रोवायला सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर त्याने आर्किटेक्ट म्हणूनही काम केले आहे. त्याच्याकडे आर्किटेक्चरची पदवी आहे. चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठात वरुणने शिक्षण घेतले. पाच वर्षाचा अभ्यासक्रम संपल्यानंतर त्यावे फ्रीलान्सिंग केले.
दिनेश कार्तिकने चेन्नईमधील या खेळाडूची प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर लवकरच कोलकाताने त्याला आपल्या संघात दाखल केले. "ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात माझी निवड होणे निश्चितच एक मोठी गोष्ट आहे. मला याची अपेक्षा नव्हती. या आयपीएलमधील माझे मुख्य उद्दीष्ट नियमितपणे संघाकडून खेळणे आणि संघाच्या विजयात योगदान देणे हे होते. मी आत्तापर्यंत चांगली कामगिरी करत आहे आणि मला आशा आहे, की भारतीय संघासाठीही मी ही कामगिरी सुरू ठेवेन. या निवडीसाठी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या निवड समितीचे मला आभार मानायचे आहेत", असे वरुणने निवडीनंतर सांगितले.