नवी दिल्ली - व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या दोन महान फलंदाजांना गोलंदाजी करणे सर्वात कठीण होते, असे भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सांगितले आहे. उमेशने स्थानिक क्रिकेटमधील सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढत ही प्रतिक्रिया दिली.
एका कार्यक्रमात उमेश म्हणाला, "मी दुलीप करंडक सामना खेळायला गेलो होतो. तेव्हा मला राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणविरूद्ध गोलंदाजी करावी लागेल असे कळले तेव्हा मला खूप भीती वाटली." मात्र, लक्ष्मण आणि द्रविडला बाद करत उमेशने ही चाचणी पास केली.
उमेश म्हणाला, "मी इतका चांगला स्पेल टाकेन असा कधी विचारही केला नव्हता. दक्षिण झोनकडून खेळताना मी पाच विकेट घेतल्या आणि त्यात द्रविडसोबतच लक्ष्मणची विकेट घेतली. त्यामुळे मला खूप फायदा झाला. अधिक आत्मविश्वास मिळाला. "
भारताकडून 46 कसोटी सामन्यांत 144 बळी घेणारा उमेश पुढे म्हणाला, "लोक म्हणतात की त्यांची परिस्थिती कठीण आहे किंवा त्यांचे जीवन खूप कठीण आहे आणि ते खूप संघर्ष करत आहेत. मी सांगू इच्छितो, आयुष्य सोपे नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर यश मिळते. "
उमेशने आतापर्यंत 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 106 बळीही घेतले आहेत.