कराची - पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याला मिरगी (अपस्मार) आजार होता. त्याने या आजारावर उपचार घेण्यास नकार दिले, असा खळबळजनक दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी केला आहे. सेठी यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
नजम सेठी यांनी २०१३ ते २०१८ या काळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि कार्यकारी समिती प्रमुख म्हणून काम पहिलं आहे. त्यांनी सांगितलं, की त्यांनी जेव्हा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांना पहिली समस्या उमरच्या रुपाने समोर आली.
सेठी यांनी एका वाहिनीला बोलताना सांगितलं, 'आमच्याकडे एक मेडिकल रिपोर्ट आला होता. त्यात उमरला मिरगीचा आजार असल्याचे स्पष्ट होतं. याच कारणामुळे आम्ही त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघारी बोलवलं होतं. मी जेव्हा उमरला भेटलो. तेव्हा याविषयी हा गंभीर आजार असल्याचे त्याला सांगितले. तसेच विश्रांती घेऊन यावर योग्य उपचार घे, असा सल्लाही दिला. पण त्याने हा सल्ला विचारात घेतला नाही.'
मी त्याला दोन महिने क्रिकेटपासून रोखलं. त्यानंतर आम्ही ते रिपोर्ट निवड समितीच्या चिकित्सकांकडे पाठवले आणि त्यांच्यावर निर्णय सोपवला. कारण मला त्यांच्या कामात हस्तक्षेप करावयाचा नव्हता, असेही सेठी यांनी सांगितलं.
मिरगीचा आजाराला फिट येणं, आकडी, अपस्मार आदी नावांनी ओळखला जातो. यात योग्य त्या वयात आणि वेळीच अचूक निदान होऊन उपचार न झाल्यास मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. मतिमंदत्व येतं. दरम्यान, सद्यघडीला उमर अकमलवर पाकिस्तान सुपर लीगमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली त्याला तीन वर्षांसाठी क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा - लाजिरवाण्या खेळाडूंच्या इलेव्हनमध्ये अजित आगरकराचा समावेश; जाणकारांसह चाहते संतापले
हेही वाचा - आकाश चोप्राच्या सर्वोत्कृष्ट टी-२० संघात ना विराट ना रोहित, पाकच्या आझमचा केला समावेश