दुबई - भारतातील वाढत्या कोरोनाच्या घटनांमुळे क्रिकेटविश्वातील महत्त्वाची स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणार असल्याची चर्चा आहे. अशा स्पर्धांसाठी आम्ही आमच्या सुविधा तयार ठेवत आहोत, असे दुबई शहरातील क्रिकेट आणि स्पर्धेचे प्रमुख सलमान हनीफ म्हणाले आहेत.
18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल खेळवण्यात येऊ शकते. हनीफ म्हणाले, "कमी वेळेत मोठ्या संख्येने सामने खेळावे लागतील. स्टेडियमवर नऊ विकेट्स आहेत. विकेट टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कोणत्याही सामन्यांचे आयोजन करणार नाही. या टी-20 लीगसाठी दुबई स्पोर्ट्स सिटी संभाव्य ठिकाण म्हणून सज्ज आहे. स्पोर्ट्स सिटीमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि आयसीसी अकादमी आहे."
सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलचा निर्णय होऊ शकतो. या बैठकीत 2021 टी-20 विश्वकरंडक आणि संबंधित समस्या, बिहार क्रिकेट बोर्डवर कर्मचारी भरती आणि बीसीसीआय व आयपीएलमध्ये डिजिटल सेवेची जाहिरात यासारख्या बाबींचा समावेश होता.
युएईमध्ये कोरोना विषाणूची 50 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. त्यातील 300 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात ही संख्या दहा लाखांवर गेली आहे आणि 25, हजारांपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.