मुंबई - आयपीएल २०२० मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा १३ धावांनी पराभव केला. दिल्लीच्या ७ बाद १६१ धावांचा पाठलाग करताना राजस्थानला ८ बाद १४८ धावा करता आल्या. या सामन्याव्दारे आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या दिल्लीच्या तुषार देशपांडेने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने या सामन्यात ३७ धावांत २ गडी टिपले.
कल्याणचा रहिवासी असलेल्या तुषारने सुरूवातीपासून फलंदाज होण्याचे स्वप्न पाहिले होते. २००७ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १३ वर्षांखालील मुलांच्या संघाची निवड शिवाजी पार्क मैदानावर होणार होती. त्यावेळी फलंदाजांच्या ट्रायलसाठीची ४० ते ४५ खेळाडूंची लांब रांग पाहून तुषार गोलंदाजांच्या रांगेत जाऊन उभा राहिला. तिथे १५ ते २० खेळाडू होते. तसेच त्यावेळी तीन वाजून गेले होते आणि निवडीची वेळ सहापर्यंतची होती. त्यामुळे तुषार फलंदाजांऐवजी गोलंदाजांच्या रांगेत जाऊन उभारला. त्या दिवशी तुषारने आश्वासक मारा करत निवड समितीच्या सदस्यांचे लक्ष वेधले.
तुषारने लहानपणी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर सोबत शिवाजी पार्क जिमखाना येथे सराव केला आहे. त्याने २०१६-१७ साली मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. २०१८-१९ च्या विजय हजारे करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तुषारने ५ विकेट्स घेत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. तो भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची विकेट घेत चर्चेत आला होता.
आयपीएलच्या १३व्या पर्वासाठी दिल्लीने तुषारवर २० लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे. तुषारने दिल्लीकडून पदार्पण करताना बेन स्टोक्स व श्रेयस गोपाल यांची विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
हेही वाचा - KXIP vs RCB : पंजाबसमोर बंगळुरूचे बलाढ्य आव्हान, किंग्जला विजयाची नितांत गरज
हेही वाचा - दिल्लीच्या एनरिकने फेकला IPL च्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू