चेन्नई - चेपॉकची खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक होती. पण सुदैवाने आमच्या फलंदाजांनी अधिक चांगला खेळ करून दाखवला. अशा खेळपट्ट्यांवर नाणेफेक फारशी निर्णायक ठरत नाही, असे स्पष्ट मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकला. यानंतर माध्यमाशी बोलताना विराटने आपले मत व्यक्त केले.
सामना संपल्यानंतर विराट म्हणाला, 'दोन्ही संघासाठी चेन्नईतील वातावरण आव्हानात्मक होते. पण आम्ही या सामन्यात धैर्याने आणि दृढ निश्चय करत खेळ केला. आम्ही टर्न आणि बाऊंस पाहून गडबडलो नाही. दोन्ही डावात आम्ही मिळून आम्ही ६०० धावा केल्या ही फार मोठी गोष्ट आहे. अशा खेळपट्ट्यांवर नाणेफेक फारशी निर्णायक ठरत नाही.'
दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय खेळपट्टीवर टीका करत इंग्लंडच्या फलंदाजीला घाबरून चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोषक बनवण्यात आली. तसेच भारताने नाणेफेक जिंकली म्हणूनच त्यांना सामना जिंकण्याची संधी मिळाली, असा दावा केला आहे.
भारतीय संघाने मालिकेत साधली बरोबरी
चेपॉक मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच विराट सेनेने इंग्लंडची भंबेरी उडवत पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढला. भारताच्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १६४ धावांत आटोपला. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने ५ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवणाऱ्या भारताच्या रविचंद्रन अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा - IND vs ENG : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 'या' खेळाडूला वगळलं
हेही वाचा - IND vs ENG: पदार्पणाच्या सामन्यात अक्षर पटेलचा खास विक्रम