पुणे - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना पुण्याच्या गहुंजे मैदानावर रंगला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने ५ बाद ६०१ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही अवधी असताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात २७५ धावांवर आटोपला. यामुळे भारताला पहिल्या डावात ३२६ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.
कर्णधार विराट कोहलीची द्विशतकी, आणि मयांक अग्रवालची शतकी खेळींच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ६०१ धावांवर घोषित केला. याच्या प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेच्या संघ पहिल्या डावात सर्वबाद २७५ धावा करु शकला. यामुळे भारतीय संघाला ३२६ धावांची आघाडी मिळाली आहे. दरम्यान, आफ्रिकेचा संघ ऑलआऊट झाल्यानंतर पंचानी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असे जाहीर केले. यामुळे भारतीय संघ आफ्रिकेला फॉलऑन देणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही.
हेही वाचा - राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा : द्युती चंदचा मोठा पराक्रम!
दरम्यान, तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेची अवस्था बिकट केली होती. उपहाराच्या सत्रापर्यंत आफ्रिकेने ६ गडी गमावत १३६ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे लवकरच आफ्रिकेचा संघ ऑलआऊट होणार असे दिसत होते. भारतीय गोलंदाजांनी त्या व्यूहरचनेतूनच गोलंदाजी केली. मात्र, कर्णधार फाफ डु-प्लेसिस, केशव महाराज आणि फिलँडरने भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवलं.
तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेने ८ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावांपर्यंत मजल मारली होती. उपहाराच्या सत्रानंतर मुथुस्वामी आणि कर्णधार फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. रविंद्र जाडेजाने मुथुस्वामीला तर आश्विनने कर्णधार फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडले. डु-प्लेसिसने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली.
डु-प्लेसिस बाद झाल्यानंतर केशव महाराज आणि फिलँडर यांनी भारतीय गोलंदाजांना दमवलं. केशव महाराजने (७२)अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अश्विनने त्याला बाद केले. त्यानंतर आलेला रबाडाही अश्विनच्या गोलंदाजीवर २ धावांवर बाद झाला. फिलँडर ४४ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अश्विनने ४ बळी टिपले. तर त्याला उमेश यादव (३), मोहम्मद शमी (२), रवींद्र जडेजा (१) यांनी चांगली साथ दिली.