नवी दिल्ली - बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत निश्चित केल्याची चर्चा आहे. मात्र, या वेळापत्रकात दिवाळीचा आठवडा (14 नोव्हेंबर) समाविष्ट नसल्याबद्दल प्रसारणकर्ते सामाधानी नाहीत. त्यामुळे बीसीसीआय स्टार इंडियाला या संदर्भात स्पष्टीकरण देण्यास तयार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार स्टारला या वेळापत्रकात जाहिराती हव्या आहेत. शिवाय त्यांना दिवाळीच्या आठवड्याचा चांगला उपयोग करायचा आहे. दिवाळी 14 नोव्हेंबरला आहे आणि त्या आठवड्याच्या शेवटी आयपीएल संपले पाहिजे, अशी स्टारची इच्छा आहे. याचा अर्थ दुपारचे अधिक सामने होतील जे दृश्यमानता आणि रेटिंगवर परिणाम करतील, असे बीसीसीआयच्या वेळापत्रकांना विरोध करणाऱ्यांनी म्हटले आहे.
या वर्षाच्या अखेर भारताला ऑस्ट्रेलिया दौरा करायचा आहे. मात्र, 3 डिसेंबरपासून सुरू होणार्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला आधीच ऑस्ट्रेलिया गाठावे लागणार आहे.
''जर 8 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल संपले तर संघ 10 तारखेला ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. जेणेकरून कोरोना चाचणी, सराव सामने इत्यादी गोष्टी पार पडल्यानंतर पहिली कसोटी निर्धारित वेळेपासून सुरू होऊ शकेल'', असे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.