पुणे - आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना खिशात घातल्यानंतर, टीम इंडिया उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. पहिल्या विजयाने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला असला तरी, उद्याच्या कसोटीमध्ये टीम इंडियाला सावधानतेने खेळावे लागेल.
हेही वाचा - अरे बापरे!..मैदानात आग ओकणारा पांड्या असह्य, पाहा व्हिडिओ
असे सांगण्याचे कारण म्हणजे, गहुंजे येथे झालेल्या शेवटच्या कसोटीत टीम इंडियाला पराभव स्वीकाराला लागला होता. शिवाय, मागील ६ वर्षांपासूनचा भारताचा मायदेशातील हा एकमेव कसोटी सामन्यातील पराभव आहे. २०१३ पासून घरच्या मैदानात भारताने आत्तापर्यंत ३० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकीच हा एक पराभव आहे.
या ३० सामन्यांपैकी २४ सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. तर ५ सामने अनिर्णित राखले आहेत. गहुंजे येथे पराभव झालेला हा सामना भारताने ऑस्ट्रेलियासोबत खेळला होता. २०१७ मध्ये झालेल्या या सामन्यात कांगारूंनी भारताचा ३३३ धावांनी पराभव केला. भारताचा पहिला डाव १०५ तर दुसरा डाव १०७ धावांवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाच्या स्टिफन ओ किफने १२ विकेट्स घेत भारताचे कंबरडे मोडले होते. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार गौरवण्यात आले. त्यामुळे गहुंजेच्या या इतिहासाचा अभ्यास करून टीम इंडियाला मैदानात उतरावे लागणार आहे.