नवी दिल्ली - भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये आज बुधवारी शेवटचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, संघाला एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाच्या एका सदस्याला गैरव्यवहाराच्या आरोपावरुन भारतात माघारी बोलवण्यात आले आहे.
भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना बीसीसीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सुब्रमण्यम यांनी वेस्ट इंडीजमधील उच्चायुक्तांशी गैरवर्तन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी बीसीसीआयकडून त्यांना इशाराही देण्यात आला आहे.

भारत सरकारतर्फे, पाणी बचतीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला जाहिरात करण्यासंदर्भात उच्चायुक्तांकडून सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता. शिवाय, त्रिनिदाद मध्ये भारताच्या उच्चायुक्तांनी सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण,सुब्रमण्यम यांनी 'मला उगाच मेसेज पाठवू नका' असे उत्तर दिले.
बीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, सुब्रमण्यम यांच्या आधीच्या अशाच प्रकरणावर कानाडोळा केला गेला होता. त्या कारणामुळेच ही स्थिती ओढवली आहे. व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना ऑस्ट्रेलियामध्ये अशाच व्यवहाराबद्दलच्या प्रकरणामध्ये सूट मिळाली होती.