दुबई - सूर्यकुमार यादवने सातत्याने चांगली कामगिरी करून देखील त्याला भारतीय संघात अद्याप स्थान मिळालेले नाही. भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी सूर्यकुमारकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप अनेक दिग्गज खेळाडूंनी केला आहे. अशात मुंबई इंडियन्सचा अनुभवी खेळाडू केरॉन पोलार्डने देखील सूर्यकुमारला त्याच्या कामगिरीचे बक्षीस मिळायला हवे, असे म्हटलं आहे.
यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सूर्यकुमारला संधी मिळेल, असे वाटत होते. परंतू तिकडेही त्याच्या पदरी निराशाच आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघांची निवड घोषित झाल्यानंतर, संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमारने बंगळुरूविरुद्ध ७९ धावांची नाबाद खेळी करत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर बोलताना पोलार्डने देखील सूर्यकुमारची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले.
काय म्हणाला पोलार्ड -
सामन्यानंतर बोलताना पोलार्ड म्हणाला की, भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सूर्यकुमार नक्कीच दु:खी असेल. देशांतर्गत, आयपीएल आणि भारतीय अ संघाकडून शानदार प्रदर्शन केल्यानंतरही सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झालेली नाही.
सूर्यकुमारच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीचे कौतूक करत पोलार्ड म्हणाला, सुर्यकुमारने संघासाठी सातत्याने धावा करत आहे. लवकरच त्याची निवड भारतीय संघात होईल. आम्ही सुरूवातीला काही विकेट फेकल्या. पण सुर्यकुमारने विजय मिळवून दिला. तुम्ही सतत चांगलं प्रदर्शन करत असाल तर तुम्हाला बक्षीस मिळायला हवे, असे पॉलार्ड म्हणाला.
दरम्यान, सूर्यकुमारने आयपीएलच्या १३ व्या हंगामात १२ सामन्यात खेळताना ४०.२२ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या आहेत.
असा रंगला सामना -
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले.