नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएलच्या तयारीविषयी सुरेश रैनाने भाष्य केले आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. धोनीच्या नेतृत्वात रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असून त्यांनी 3 मार्चपासून आयपीएलची तयारी सुरू केली होती.
रैना म्हणाला, ''धोनीने यावर्षी इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) वेगळ्या पद्धतीने तयारी केली होती. सुरुवातीला त्याने फारसे लक्ष दिले नाही पण नंतर त्याने आपले लक्ष फक्त जिमवर ठेवले. तो खूप चांगले फटके खेळत होता आणि त्याचा फिटनेसही चांगला होता. तो फारसा दमतही नव्हता."
रैना पुढे म्हणाला, "त्याची तयारी यावेळी खूप वेगळी होती. मी बऱ्याच वर्षांपासून राष्ट्रीय संघात त्याच्याबरोबर खेळलो आहे. तो आयपीएलसाठी सज्ज झाला होता. पण यावेळी वेळ वेगळी होती, म्हणून मला आशा आहे की सामना लवकरात लवकर सुरू होईल. जेव्हा एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करते तेव्हा प्रार्थना आणि आशीर्वाद त्यांना मार्ग दाखवतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी, रायुडू, माही भाई आणि मुरली विजय एका गटात फलंदाजी करत होतो"
"जेव्हा धोनी चेन्नईमध्ये होता तेव्हा तो दोन ते चार तास फलंदाजी करायचा. पण यावेळी तो फक्त फलंदाजी करत नव्हता. तर सकाळी जिम देखील करत होता. त्यानंतर संध्याकाळी तीन तास फलंदाजी करायचा", असेही रैनाने सांगितले.