मुंबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरूला ६ गड्यांनी धूळ चारत क्वालिफायर फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, हैदराबादची कामगिरी स्पर्धेच्या सुरूवातीला खराब ठरली. पण त्यांनी शेवटच्या महत्वपूर्ण सामन्यात तडाखेबंद कामगिरी नोंदवत आपली स्पर्धेतील घौडदौड कायम राखली. दरम्यान, हैदराबादच्या या यशात चार आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधारांचे मोलाचे योगदान आहे. वाचा कोण आहेत ते कर्णधार...
केन विल्यमसन -
केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचा कर्णधार आहे. त्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ११ सामन्यात खेळताना २५० धावा केल्या आहेत. बंगळुरूविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने नाबाद ५० धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिलेला आहे.
राशिद खान -
राशिद खानने अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने आयपीएल २०२० मध्ये १५ सामन्यात १९ गडी बाद केले आहेत. संघासाठी राशिद हुकमी एक्का ठरलेला आहे. संघ अडचणीत असताना, त्याने मोक्याच्या क्षणी गडी बाद करत संघासाठी आपले योगदान दिले आहे.
जेसन होल्डर -
वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व जेसन होल्डरने केले आहे. आयपीएलमध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यावर चांगली कामगिरी नोंदवत अष्टपैलू छाप सोडली आहे. ६ सामन्यात त्याने ५५ धावा आणि १३ गडी बाद केले आहे. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद २४ धावांची खेळी साकारली.
डेव्हिड वॉर्नर -
वॉर्नर हैदराबाद संघाचा कर्णधार आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व काही सामन्यात केले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये वॉर्नरने १५ सामन्यात ५४६ धावा झोडपल्या आहेत.