नवी दिल्ली - भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीचे कौतुक केले आहे. कसोटीत १०,००० धावा करणारे गावसकर हे पहिले फलंदाज आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी रोहितच्या फलंदाजीची स्तुती केली.
गावसकर म्हणाले, "रोहित शर्मा ज्याप्रकारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामी देतो आणि ज्याप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये फटके खेळायला सुरूवात करतो, मला तशाच पद्धतीने खेळायचे होते. परंतु त्यावेळीच्या परिस्थितीमुळे आणि मला माझ्यावर इतका आत्मविश्वास नव्हता, की मी वेगवान धावा करू शकतो. त्यामुळे मी कधीही अशी फलंदाजी केली नाही. परंतु जेव्हा असा फलंदाज दिसतो तेव्हा मला खूप आनंद होतो.''
२०१५ नंतर, रोहितने ९७ एकदिवसीय सामन्यांत ६२.३६च्या सरासरीने आणि ९५.४४ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. या काळात त्याच्या नावावर २४ शतके जमा आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या सध्याच्या भारतीय संघाचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले, "मला विश्वास आहे की सद्याच्या कसोटी संघात संतुलन, क्षमता, कौशल्य असल्याने हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भारतीय संघ आहे. मी यापेक्षा चांगल्या भारतीय कसोटी संघाचा विचार करू शकत नाही. या संघाकडे अशी आक्रमकता आहे, ज्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर सामना जिंकू शकतो. या संघाला परिस्थितीच्या मदतीची आवश्यकता नाही. परिस्थिती काहीही असली तरी ते कोणत्याही विकेटवर सामने जिंकू शकतात. १९८०च्या दशकातील संघाच्या फलंदाजी आणि आता फारच साम्य होते, परंतु विराटकडे असणारे गोलंदाज त्यावेळी नव्हते.''