मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर 1985 मधील बी अँड एच वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील भारताच्या अविस्मरणीय विजयाला पुन्हा जिवंत करणार आहेत. गावस्कर सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कच्या (एसपीएसएन) 'सोनी टेन पिट स्टॉप' कार्यक्रमात या स्पर्धेसंबंधी आपल्या आठवणी सांगणार आहेत. त्यांच्यासोबत पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि समालोचक रमीज राजा हेदेखील असणार आहेत.
रवी शास्त्री, इयान चॅपेल, मायकेल होल्डिंग आणि मदन लाल या दिग्गज क्रिकेटपटूंनी 'सोनी टेन पिट स्टॉप'वर आपले अनुभव सांगितले आहेत. क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिप हा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या सात संघांमध्ये खेळलेला 'मिनी' वर्ल्ड कप होता.
या स्पर्धेत दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. या स्पर्धेतील सर्व संघांना भारताने पराभूत केले. अंतिम सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात देत विजेतेपद पटकावले होते.
ही मालिका भारतीय क्रिकेटमधील क्रांती होती. पूर्वापार चालत असलेल्या पांढऱ्या कपड्यांची परंपरा या मालिकेने मोडित काढली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रंगीत कपड्यांमध्ये भारताने जिंकलेली ही पहिली मोठी स्पर्धा होती.