नवी दिल्ली - श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथने तब्बल साडेतीन वर्षानतर संघात पुनरागमन केले. मोहालीमध्ये भारताविरुद्ध स्मिथने शेवटचा टी-२० सामना खेळला होता. घोषणा करण्यात आलेल्या संघातून मार्कस स्टोईनिसला डच्चू मिळाला आहे.
हेही वाचा - सायना नेहवाल संकटात!..नाराज होऊन केले परराष्ट्र खात्याला ट्विट
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये स्टोईनिसने फक्त ८७ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. स्टिव्ह स्मिथसोबत सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज फलंदाज ख्रिस लीन आणि डार्सी शॉर्ट या फलंदाजांना मात्र संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ लंकेविरुद्ध २७, ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला तीन टी-२० सामने खेळणार आहे. तर, ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान कांगारू पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळतील.
ऑस्ट्रेलिया संघ :
अॅरॉन फिंच (कर्णधार), एश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅक्डरमोट, केन रिचर्ड्सन, स्टिव्ह स्मिथ, बिलि स्टॅनलेक, मिचेल स्टार्क, एश्टन टर्नर, अँड्रयू टाई, डेव्हिड वार्नर.