कोची - भारतीय वेगवान गोलंदाज श्रीशांतने शोएब अख्तरच्या सूचनेवर टीका केली आहे. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात निधी गोळा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान मालिका आयोजित करण्याविषयी अख्तरने म्हटले होते.
श्रीशांत म्हणाला, "जोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत काहीही घडू शकत नाही. पाकिस्तानशी आमचे संबंध चांगले नाहीत. म्हणून भारताला आणि आरोग्याला प्राथमिकता दिली पाहिजे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारल्याशिवाय मी वैयक्तिकरित्या पाकिस्तानशी खेळण्याच्या बाजूने नाही."
श्रीशांत टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य होता. २०११ वर्ल्ड कपपासून तो भारताकडून खेळलेला नाही. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदीतून श्रीशांत १३ सप्टेंबर २०२० ला सुटणार आहे. २००५ मध्ये श्रीशांतने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्या आहेत.