तिरुअनंतपुरम - भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत लवकरच क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक स्पर्धेसाठी श्रीशांतचा केरळमधील २६ खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा - जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडला तिसरे स्थान
आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) मॅच फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीशांतवर बंदी घातली होती. मात्र, त्याची शिक्षा कमी करण्यात आली. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो या बंदीतून मुक्त झाला. श्रीशांतची बंदी यावर्षी सप्टेंबरमध्ये संपली. केरळच्या मंगळवारी जाहीर झालेल्या संभाव्य खेळाडूंच्या यादीतील संजू सॅमसन, सचिन बेबी, जलाज सक्सेना, रॉबिन उथप्पा आणि बासिल थंपी यांसह ३७ वर्षीय श्रीशांतचा समावेश करण्यात आला आहे.
शिबिर सत्रात घेणार भाग -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीशांत २० ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या संघाच्या शिबिर सत्रात भाग घेईल. यापूर्वी, केरळ क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित टी-२० मालिकेतील एका संघासाठी त्याची निवड झाली होती. २०११ मध्ये त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००७मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा तो भाग होता.
कोरोना साथीच्या आजारामुळे ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा उशीरा होत आहे. २०२०-२१ हंगामातील बीसीसीआयची ही पहिली देशांतर्गत स्पर्धा असेल.
संभाव्य खेळाडूंचा संघ -
रॉबिन उथप्पा, जलाज सक्सेना, संजू सॅमसन, विष्णू विनोद, राहुल पी, मोहम्मद अझरूदीन, रोहन कुन्नुमेल, सचिन बेबी, सलमान निझर, बासिल थंपी, एस. श्रीशांत, एमडी निधेश, केएम आसिफ, बेसिल एनपी, अक्षय चंद्रन, सिजोमोन जोसेफ, मिधुन एस, अभिषेक मोहन, वत्सल गोविंद, आनंद जोसेफ, विनोप मनोहरन, मिधुन पीके, सारिप, अक्षय केसी, रोसिथ, अरुण एम.