मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज क्षेत्ररक्षक अशी ओळख असलेल्या जाँटी ऱ्होड्सचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅक केलेल्या व्यक्तीने सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर केलेले ट्विट जाँटीच्या अकाउंटवरून पोस्ट केले. शेतकरी आंदोलनावरील ट्विटवरून सचिनला भयंकर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.
हेही वाचा - विराटचं सोशल मीडियावर का होतंय कौतुक?
''भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरचे लोक प्रेक्षक असू शकतात परंतु, यात सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत देश माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहूया", असे सचिनने ३ फेब्रुवारी रोजी शेतकरी आंदोलनावर ट्विट करत लिहिले होते.
या ट्विटनंतर काही वेळातच सारखेच ट्विट ऱ्होड्सच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट झाले. ऱ्होड्सने स्वत: हे ट्विट केले नसून आपोआपच त्याच्या अकाउंटवर हे ट्विट पोस्ट झाले आहे. इंस्टाग्राम अकाउंटवरुन ऱ्होड्सने यासंदर्भात माहिती दिली आहे.
जाँटी ऱ्होड्सची कारकीर्द -
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जाँटी ऱ्होड्सने प्रशिक्षणाचा मार्ग अवलंबला. तो आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक होता. गतवर्षी त्यांची किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. क्रिकेट कारकिर्दीत त्याने २४५ एकदिवसी सामन्यात २ शतकांच्या मदतीने ५९३५ धावा केल्या आहेत. तसेच ५२ कसोटी सामने खेळताना २५३२ धावा केल्या आहेत.