केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू व्हेरनॉन फिलँडरने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. ३४ वर्षीय फिलँडर इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.
फिलँडरने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर कसोटीत २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात 'एन्ट्री' केली होती. त्याने पदार्पणाच्या सामन्यात १५ धावात ५ गडी बाद करत लक्ष वेधले होते. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या ७ सामन्यांत ५० विकेट पूर्ण केल्या असून १९०० सालापासून अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेनंतर फिलँडर क्रिकेटला अलविदा करणार आहे. फिलँडरने ६० कसोटी सामन्यांत २१६ विकेट घेण्याबरोबरच ८ अर्धशतकांसह १६१९ धावा करून आपल्या अष्टपैलूत्वही सिद्ध केले.
निवृत्ती विषयी बोलताना फिलँडर म्हणाला, 'दक्षिण आफ्रिका संघातील माझा प्रवास हा खूप सुंदर होता. आता त्याच उर्जेने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्याचे लक्ष्य मी बाळगले आहे.'
फिलँडरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
प्रकार | सामने | बळी | सर्वोत्तम |
कसोटी | ६० | २१६ | ६-२१ |
एकदिवसीय | ३० | ४१ | ४-१२ |
टी-२० | ७ | ४ | २-२३ |