मुंबई - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. आफ्रिकेचा संघ ही मालिका खेळण्यासाठी काही तासांमध्येच भारतात दाखल होणार आहे. उभय संघात पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या भितीमुळे आफ्रिकन संघाने भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोना चीनमधून तब्बल ९० देशांत पसरला आहे. या व्हायरसमुळे ४ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाखाहून अधिक नागरिक या व्हायरसने बाधित झाले आहेत. भारतात ४० हून अधिक नागरिकांना याची बाधा झाली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या भितीने याआधी इंग्लंड संघाने श्रीलंकन खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱ्याआधीच इंग्लंडचा कर्णधार जो रुटने संघातील खेळाडूंची भूमिका स्पष्ट केली.
आता दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही हस्तांदोलन करणार नसल्याचे सांगितलं आहे. आज आफ्रिकेचा संघ भारतात दाखल होणार आहे.
याविषयी आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितलं की, 'व्हायरसच्या भितीमुळे आम्ही भारत दौऱ्यात हस्तांदोलन करणे टाळू इच्छित आहोत. आमच्यासाठी खेळाडूंची प्रकृती महत्वाची आहे. आमच्या मेडिकल टीमकडून आम्हाला यासंदर्भात सूची देण्यात आली आहे.'
हेही वाचा - VIDEO : T-२० फायनल : कुलदीप, अमित मिश्रासह सुशील कुमार यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा
हेही वाचा - ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता; भारताचा ८५ धावांनी पराभव