नवी दिल्ली - पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्यावरुन परतल्यानंतर भारत फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. त्यानंतर, आयपीएलचे १४वे पर्व एप्रिलपासून सुरू होईल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्य क्रिकेट संघटनांना याबाबत माहिती दिली. गांगुलींनी गुरुवारी राज्य संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. ''भारत आगामी वर्षापासून स्पर्धांचे आयोजन करण्यास प्रारंभ करेल. यात टी-२० विश्वकरंडक आणि २०२३मध्ये होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा समाविष्ट आहे.
कोरोनामुळे बीसीसीआयला संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये यंदाच्या आयपीएलचे आयोजन करावे लागले आहे. ''आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे, की बीसीसीआय १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईमध्ये आयपीएल-२०२०चे आयोजन करत आहे. आयपीएल आरामात होण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक गोष्टी केल्या आहेत'', असे गांगुलीने पत्रात लिहिले आहे.
या पत्रात तो पुढे म्हणाला, "जेथे देशांतर्गत क्रिकेटचा प्रश्न आहे, तो आमच्यासाठी ऑफ सीझन आहे. परिस्थिती सुधारल्याबरोबर बीसीसीआय घरगुती क्रिकेट सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आम्हाला आशा आहे की येत्या काही महिन्यांत कोरोनाची स्थिती सुधारेल आणि आम्ही सुरक्षित वातावरणात देशांतर्गत क्रिकेट सुरू करू शकू. ज्येष्ठ महिला संघाच्या दौर्याचीही चर्चा आहे आणि लवकरच अधिक माहिती दिली जाईल."