मँचेस्टर - आयसीसी विश्वकंरडक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामना भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या संघ निवडीवरुन माजी कर्णधार सौरव गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे. उपांत्य सामन्यात कोहलीने एकमात्र बदल केला तो कुलदीप यादवच्या ठिकाणी युजवेंद्र चहलच्या रुपाने. मात्र, स्पर्धेत लयीत असलेल्या मोहम्मद शमीला संघाबाहेर बसवल्याने गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हर्षा भोगले यांनीही ट्विट करत नाराजी व्यक्त केली.
विश्वकरंडकात भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद शमीला खेळण्याची संधी मिळाली. शमीने मिळालेल्या संधीचे सोने करत चार सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या. त्यानंतर तंदुरुस्त होऊन भुवी पुन्हा श्रीलंकेविरुध्दच्या साखली सामन्यात पुनरागम केले. आजच्या सामन्यात लयीत असलेल्या शमीला संघात घेण्यात यावे, अशी मागणी होती. मात्र, कोहलीने भुवी आणि बुमराहसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. यामुळे समालोचक करताना गांगुलीने कोहलीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
हर्षा भोगलेही नाराज -
गांगुलीप्रमाणे मीही शमीला न खेळवण्याच्या कोहलीच्या निर्णयावर नाराज आहे. त्याने स्पर्धेत मोक्याच्या ठिकाणी विकेट काढल्या आहेत. तसेच आपल्याकडे रविंद्र जडेजाच्या रुपाने आठव्या क्रमांकापर्यत फलंदाज होते. न्यूझीलंड विरुध्द कुलदीपची कामगिरी चांगली होती. तरीही त्याला वगळण्यात आले. हा निर्णय धाडसी म्हणावे का असा सवाल हर्षा भोगले यांनी ट्विट करत विचारला आहे.