मुंबई - श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडीजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेस्ट इंडीज संघाच्या निवड समितीने ४१ वर्षीय ख्रिस गेलची १२ सदस्यीय संघात निवड केली आहे. गेल तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करणार आहे. गेलने २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता.
श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० मालिका तीन मार्च ते सात मार्च या दरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केरॉन पोलार्डकडे सोपविण्यात आले आहे. तर निकोलस पुरन हा उपकर्णधार आहे. ख्रिस गेलची देखील या मालिकेसाठी विंडीज संघात निवड झाली आहे.
उभय संघातील मालिका ही, भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे. या स्पर्धेची तयारी विंडीज संघाने सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून मागील टी-२० विश्व करंडक जिंकणाऱ्या या संघामध्ये ख्रिस गेलचा समावेश करण्यात आला आहे.
गेलने मागील अठरा महिन्यांमध्ये वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची निवड विंडीज संघात करण्यात आली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ -
केरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फेबियन एलन, ड्वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्डस, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, ओबेद मॅककॉय, रोवमॅन पॉवेल, लेंडल सिमन्स आणि केव्हिन सिनक्लेयर.
हेही वाचा - IND vs ENG : मोटेराच्या खेळपट्टीवरुन इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंमध्ये दुमत
हेही वाचा - IND vs ENG: बुमराहची चौथ्या कसोटीतून माघार, जाणून घ्या कारण