मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दोन्ही डावात तो स्वस्तात बाद झाला. या निराशजनक कामगिरीमुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. आता शॉच्या जागेवर शुबमन गिलला सलामीची संधी मिळण्याची शक्यता आहे. याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत.
उभय संघामध्ये २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने शुबमन गिलचा नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावरून शुबमन गिलला सलामीला खेळण्याची संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
टीम इंडिया कसोटी मालिकेत पिछाडीवर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना (दिवस रात्र) अॅडलेडच्या मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पहिल्या सामन्यात फलंदाजांची हाराकिरी -
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला कशीबशी २४४ धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९१ धावा करू शकला. पहिल्या डावात भारतीय संघाने आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात भारतीय धुरंदर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर ढेर झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावात आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे आव्हान २ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला खेळणार
कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला आहे. अजिंक्य रहाणे त्याच्या अनुपस्थितीत भारताचं नेतृत्व करणार आहे.
हेही वाचा - श्रीलंका दौऱ्यासाठी इंग्लंडच्या संघात येणार आफ्रिकेचा माजी फलंदाज
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वॉर्नरसोबत 'हा' खेळाडू संघातून बाहेर!