मुंबई - भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 15 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या अगोदर भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. शिखर धवनच्या जागी मयंक अग्रवालची संघात वर्णी लागली आहे. संघ निवड समितीनेही याला दुजोरा दिला आहे.
सईद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान महाराष्ट्राविरूद्ध खेळताना धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. याच कारणाने तो वेस्टइंडीज विरूद्ध सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतूनही बाहेर आहे.
धवनच्या जागी संघात स्थान मिळवलेला मयंक अग्रवाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कसोटी पदापर्णाच्या सत्रात त्याने 9 कसोटी सामन्यांमध्ये 67.07 च्या सरासरीने 872 धावा केल्या आहेत. यात 2 धमाकेदार द्विशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.
हेही वाचा - भारत वि. विंडीजमध्ये वानखेडेवर आज निर्णायक टी-२० लढत.. मालिकाविजयासाठी दोन्ही संघ सज्ज
मयंक सध्या रणजी सामने खेळत असून तो पहिल्या एकदिवसीय सामन्याअगोदर भारतीय संघात सामील होईल. यापूर्वी इंग्लंड येथे झालेल्या विश्वकरंडकादरम्यान दुखापतग्रस्त विजय शंकरच्या जागी मयंकचा संघात समावेश झाला होता. मात्र, मैदानावर येण्याची संधी मिळाली नव्हती. आताही के एल राहुलचा फॉर्म पाहता मयंकला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता धूसरच आहे.