कराची - स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला पाकिस्तान संघाचा फलंदाज शर्जील खान आपली शिक्षा संपल्यानंतर क्रिकेटमध्ये परतणार आहे. एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, या प्रकरणी शर्जीलने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (पीसीबी) बिनशर्त माफी मागितली आहे.
शर्जीलची शिक्षा माफ होणार असून त्याचे पुनरागमन होईल, असे पीसीबीने जाहीर केले आहे. शर्जीलने एका निवेदनात म्हटले आहे, 'माझ्या चुकीच्या आणि बेजबाबदार वागण्यामुळे मी माझे सहकारी, चाहत्यांची आणि कुटुंबीयांची माफी मागितली आहे. मी परत क्षमा मागतो आणि भविष्यात परत अशी चूक होणार नाही याची जबाबदारी घेतो.'
ऑगस्ट २०१७ मध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) दुसर्या हंगामात इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळत असताना २९ वर्षीय शर्जील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळला होता. त्यानंतर त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता शिक्षा पूर्ण झाल्यानंतर, तो पाकिस्तान क्रिकेट संघात फलंदाजी करण्यास उत्सुक आहे.