मुंबई - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील नामंवत मंडळी, देशवासियांना याबाबत सतर्कतेचे आवाहन करत आहेत. आयपीएलमधील केकेआर संघाचा मालक आणि बॉलीवूड किंग शाहरुख खाननेही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याने, लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन केलं आहे. आता शाहरूख दुबईकरांना आवाहन करत आहे.
दुबई मीडिया ऑफीस या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख दुबईवासियांसाठी आवाहन करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
या व्हिडीओत शाहरुख म्हणतो की, 'आपण सगळे जण पाहत आहोत की, जगभरातील बऱ्याच देशांमध्ये, शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे दुबईच्या बंधू-भगिनींसाठी माझी एक विनंती आहे की, तुम्हीदेखील कामावर जाऊ नका. आपल्या घरातच राहा. मैदाने, हॉटेल्स आणि समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नका.'
कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याला घरात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही तुमच्या घरातच राहा. सर्व अत्यावश्यक सेवा तुम्हाला पुरवण्यात येतील. त्यामुळे घाबरून जाऊ नका, चिंता करू नका. मी आशा करतो की, तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन कराल आणि सुरक्षित राहाल, असे आवाहन शाहरुख व्हिडिओच्या माध्यमातून दुबईकरांना करताना दिसत आहे. दरम्यान, शाहरुख दुबईचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
शाहरुखने याआधी भारतीयांसाठी व्हिडिओच्या माध्यमातून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्याने २० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या, असे आवाहन केले होते. याशिवाय आयपीएल स्पर्धेपेक्षा लोकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचेही शाहरुख म्हणाला होता.
शाहरुखचा दुबईकरांना आवाहन करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचे पडसाद भारतामध्येही उमटायला सुरुवात झाली आहे. काही चाहत्यांनी तर शाहरुख भारत सरकारला कधी मदत करणार, असा सवालही विचारला आहे.
हेही वाचा - Video : राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा कोरोनावर हल्लाबोल, गायलं भन्नाट रॅप सॉन्ग
हेही वाचा - इरफान पठाण म्हणतोय, पुलिसवालोंका पगार बढाओ... व्हिडिओ व्हायरल