वेलिंग्टन - न्यूझीलंड दौर्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा सातवा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वी, ५३ सदस्यांच्या संघात ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता काल, शुक्रवारी घेतलेल्या चाचणीत अजून एका सदस्याची भर पडली आहे.
न्यूझीलंडच्या नियमांनुसार, विलगीकरणाच्या कालावधीच्या तिसर्या आणि बाराव्या दिवशी चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे. नव्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या खेळाडूला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचे आरोग्य महासंचालक डॉ. अॅश्ले ब्लूमफिल्ड म्हणाले होते की, पाकिस्तानचा संघ नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाला. त्यांनी मालिका रद्द करण्याबद्दलही भाष्य केले. खेळाडूंना पहिली चाचणी होईपर्यंत तीन दिवस खोलीतच रहावे लागते. परंतु हे खेळाडू नियमांचे पालन करू शकले नाहीत.
आरोग्य मंत्रालयाने इशारा दिल्यानंतर संघाच्या वर्तनात सुधारणा झाली. पाकिस्तानचा संघ तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडला पोहोचला आहे. पहिला टी-२० सामना १८ डिसेंबरला होईल.