लाहोर - पाकिस्तानच्या सहा क्रिकेटपटूंचा दुसरा गट शुक्रवारी इंग्लंडला रवाना होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी ही माहिती दिली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सद्वारे फखर जामन, मोहम्मद हसनैन, मोहम्मद हाफिज, मोहम्मद रिजवान, शादाब खान आणि वहाब रियाज इंग्लंडला रवाना होतील.
या सर्व खेळाडूंसाठी दुसरी कोरोना चाचणी 29 जूनला घेण्यात आली. यात हे खेळाडू निगेटिव्ह आढळले. मँचेस्टरमध्ये पोहोचल्यानंतर हे सहा खेळाडू वॉर्सेस्टरला जातील. तेथे त्यांची इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ईसीबी) चाचणी घेतली जाईल.
पाकिस्तान संघातील एकूण 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु पुन्हा चाचणी घेण्यात आल्या नंतर काही जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. पाकिस्तानला इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. ही मालिका 30 जुलैपासून सुरू होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती होऊ शकली नाही. आता ही मालिका ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे.
या मालिकेच्या आधी इंग्लंडला वेस्ट इंडिजविरुद्ध 8 जुलैपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.