राजकोट - रणजी करंडक स्पर्धेच्या ८६ वा हंगामाचा अंतिम सामना सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात खेळला जात आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात सौराष्ट्राने पहिल्या डावात १७१.५ षटकात सर्व बाद ४२५ धावा केल्या आहेत. सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकट ३५ चेंडूत २० धावा करून संघाचा शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला.
हेही वाचा - भारताचा भालाफेकपटू शिवपाल करणार पहिल्यांदाच ऑलिम्पिकवारी
नाणेफेक जिंकून सौराष्ट्राने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत पहिल्या दिवशी ५ बाद २०६ धावा केल्या. तर, चेतेश्वर पुजारा आणि अर्पित वसावडा या फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्राने दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ३८४ धावा केल्या. वसावडाने २८७ चेंडूत ११ चौकाराच्या मदतीने १०६ धावांची खेळी केली. त्याचे या हंगामातील लागोपाठ दुसरे, तर कारकिर्दीतील ७ वे शतक ठरले.
अर्पित वसावडा बाद झाल्यानंतर पुजाराने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील ६० वे अर्धशतक झळकावले. तो मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने ६६ धावा केल्या. बंगालकडून आकाश दीपला चार, मुकेश कुमारला दोन, शाहबाज अहमदला तीन तर, इशान पोरेलला एक बळी घेता आला.
बंगालने आपल्या डावाला सुरूवात केली असून त्यांनी १४ षटकात दोन बाद ३५ धावा केल्या आहेत.