राजकोट - देशातील सर्वात मोठी स्थानिक क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या रणजी करंडकाचा अंतिम सामना सौराष्ट्र विरुद्ध बंगाल यांच्यात खेळला जात आहेत. सौराष्ट्रच्या पहिल्या डावातील ४२५ धावांच्या प्रत्त्युतरादाखल बंगालने तिसऱ्या दिवसाअखेर ६५ षटकात ३ बाद १३४ धावा केल्या आहेत. सुदीप चटर्जी ४७ तर वृद्धीमान साहा ४ धावांवर नाबाद आहे. पहिल्या डावात बंगाल अद्याप २९१ धावांनी पिछाडीवर आहे.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये रंगलेल्या या सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४२५ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाअखेर सौराष्ट्रने ८ बाद ३८४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा, सौराष्ट्रच्या शेवटच्या दोन फलंदाजांनी ४१ धावांची भर घातली आणि सौराष्ट्रचा पहिला डाव ४२५ धावांवर आटोपला.
बंगालचे सलामीवीर सुदीप कुमार आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी ३५ धावांची सलामी दिली. धर्मेंद्रसिंह जडेजाने सुदीपला (२६) बाद करत बंगालला पहिला धक्का दिला. सुदीप पाठोपाठ अभिमन्यूला (९) प्रेरक मांकडने माघारी धाडत बंगालला अडचणीत आणले. बंगालची अवस्था २ बाद ३५ अशी झाली असताना, सुदीप चॅटर्जी आणि मनोज तिवारी यांनी डाव सावरला.
सुदीप-मनोज या जोडीने तिसऱ्या गडीसाठी ८९ धावांची भागिदारी केली. मनोज तिवारीला (३५) चिराग जैनीने पायचित केले. यानंतर सुदीप चॅटर्जी आणि वृद्धीमान साहा यांनी नाबाद १० धावांची भागिदारी करत संघाला तिसऱ्या दिवशी नुकसान होऊ दिले नाही. सुदीप ४७ तर साहा ४ धावांवर नाबाद आहे. धर्मेद्रसिंह जडेजा, प्रेरक मांकड, चिराग जैनी यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : मैदान रिकामेच राहणार.. पहिल्या सामन्याकडे चाहत्यांनी फिरवली पाठ
हेही वाचा - IND VS SA : कोरोनाच्या धास्तीने भारतीय खेळाडू म्हणतो... 'ही' गोष्ट टाळणार