मुंबई - चार दिवसाच्या कसोटी संकल्पनेविषयी क्रिकेट विश्वातून मान्यवर व्यक्तींकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. यात आणखी एका क्रिकेटरची भर पडली आहे. भारताचे माजी तडाखेबंद फलंदाज संदीप पाटील यांनीही चार दिवसांच्या कसोटीच्या नव्या संकल्पनेला विरोध केला आहे. त्यांनी ही संकल्पना मूर्खपणाची असल्याचे सांगितले.
संदीप पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, सचिन तेंडुलकरनेही कसोटी क्रिकेटची जी समर्पक व्याख्या केली आहे, तेच माझेही म्हणणे आहे. मी जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू आहे. कसोटीतील पहिला दिवस हा वेगवान गोलंदाजांचा असतो आणि कसोटी क्रिकेट यातच त्या क्रिकेट प्रकाराचे वैशिष्ट्य सामावले आहे.'
ते वैशिष्ट्य कसोटीला चार दिवसांवर आणून आपण घालवून टाकणार आहोत का, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, श्रीलंकेचा महेला जयवर्धनने, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यांच्यासह अनेकांनी विरोध दर्शवला आहे.
जयवर्धनने, कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असायला हवे, असे स्पष्ट मत मांडले आहे. जयवर्धने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) क्रिकेट समितीचे सदस्य असून त्याचा समावेश असलेली आयसीसीची क्रिकेट समिती या मुद्यावर पुढील बैठकीत चर्चा करणार आहे. आयसीसी क्रिकेट समितीचे प्रमुख, भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईत २७ ते ३१ मार्च या कालावधीत आयसीसीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल.
दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया बोर्ड मात्र या प्रस्तावावर चर्चेस तयार आहे. बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांनी मात्र या प्रस्तावावर सध्या बोलणे अतिघाईचे ठरेल, असे मत नोंदविले आहे.
हेही वाचा - IND VS NZ : न्यूझीलंडला गळती, दुखापतीने लॅथम 'आऊट' तर बोल्टबाबत साशंकता
हेही वाचा - ICC Test Ranking : विराटसह स्टिव्ह स्मिथला १४ कसोटी खेळणाऱ्या लाबुशेनचा धोका