नवी दिल्ली - आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ गड्यांनी पराभव केला. अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनने चेन्नईसाठी मोक्याच्या क्षणी स्फोटक फलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली. रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर धोनी मैदानात येईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, त्याच्या जागी करनला बढती मिळाली. धोनीच्या या निर्णयाने मी हैराण झालो, असे करनने सामन्यानंतर सांगितले. इतकेच नव्हे, तर तो चतुर असल्याचेही करन म्हणाला.
२२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू करनने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सीएसकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. संघाला १७ चेंडूत २९ धावांची गरज असताना सॅम करन मैदानात आला. त्याने केवळ सहा चेंडूत १८ धावा कुटल्या. करन म्हणाला, ''खरे सांगायचे तर मला आश्चर्य वाटले की, मला फलंदाजीसाठी पाठवले गेले. तो (धोनी) चतुर आहे आणि अर्थातच त्याने काहीतरी विचार करूनच ही गोष्ट केली असेल.''
तो म्हणाला, ''आम्ही त्या षटकात (१८वे षटक) जास्त धावा करायचे ठरवले. मी षटकार मारणे किंवा बाद होणे या मानसिकतेसह गेलो होतो. कधीकधी अशा गोष्टी काम करतात तर, कधीकधी याच गोष्टी आपल्या विरुद्ध दिशेने जातात.''
रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी मैदानात येईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण धोनीने इंग्लंडच्या सॅम करनला फलंदाजीसाठी पाठवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. डावा-उजवा हे कॉम्बिनेशन कायम राहावे, यासाठी संघाने रणनिती आखली होती. त्याचा भाग म्हणून धोनी वरच्या फळीत फलंदाजीसाठी आला नाही. त्याने आधी जडेजा त्यानंतर करनला पाठवले. याशिवाय धोनीला पाठदुखीचा त्रास होत होता, असे समजते. कारण धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी फिजिओ त्याच्या पाठीवर औषधाचा स्प्रे मारताना दिसला.