मुंबई - लॉकडाऊनमुळे खेळाडू मागील अडीच महिन्यांपासून आपापल्या घरीच आहेत. अशा परिस्थितीमध्ये घरात बसून कंटाळलेले खेळाडू एकमेकांना घरातच चॅलेंज देत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक चॅलेज दिले आहे. त्याने सचिनला मैदानाच्याऐवजी स्वयंपाकघरात शतक ठोकून दाखव, असे चॅलेंज दिले. स्वयंपाकघरात पोळी लाटण्यासाठी वापरण्यात येणारे लाटणे आणि चेंडू याच्या सहाय्याने १०० वेळा चेंडू 'कीप इट अप' चॅलेंजप्रमाणे उडवून दाखवायचे, असे हे चॅलेंज आहे.
युवीच्या या चॅलेंजला सचिनने दमदार उत्तर दिले आहे. तो म्हणतो, 'मी दिलेल्या आधीच्या चॅलेंजचे उत्तर तू खूप मस्त दिले आहेस. विशेष म्हणजे, त्या चॅलेंजसाठी तू स्वयंपाकघरात जाऊन लाटण्याने चेंडू हवेत उडवलास. पण मित्रा, जेव्हा कोणी स्वयंपाकघरात असतो आणि त्याच्या हातात लाटणे असते. तेव्हा त्याने लोकांना पराठे खायला घालावेत. माझ्याकडे दही आणि लोणचे आहे, फक्त डिश रिकामी आहे. लवकर मला पराठे पाठवून दे.'
या आधी युवीने सचिनला कीप इट अप चॅलेंज दिले होते. बॅट उभी धरून बॅटेच्या कडेने (edge) चेंडू शक्य तितक्या वेळा टोलवत राहणे, असे हे चॅलेंज होते. युवीचे हे चॅलेंज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहज पूर्ण केले होते. महत्वाचे म्हणजे, सचिनने हे चॅलेंज चक्क डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण केले होते. या चॅलेंजचा व्हीडिओसोबत सचिनने आणखी एक व्हीडिओ शेअर केला होता. त्यात त्याने डोळ्यावर बांधलेल्या काळ्या पट्टीचे रहस्यदेखील सांगितले होते. तो म्हणाला की, मला त्या काळ्या पट्टीतून सर्व काही दिसत होते.
हेही वाचा - गंभीर आणि आफ्रिदीने वाक् युद्ध संपवून शांत राहावे, वकार मास्तरांचा सल्ला
हेही वाचा - भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीच्या बायकोने सोशल मीडियावर दिल्या शिव्या