नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनदीप सिंग यांचे कौतुक केले आहे. शनिवारी आयपीएलमध्ये कोलकाताने दिल्लीला तर, रोमांचक सामन्यात पंजाबने हैदराबादवर मात केली. या दोन्ही सामन्यात जिंकणाऱ्या संघाला विजेतेपणासोबतच भावनेचा स्पर्श होता.
कोलकाताकडून विजयी खेळी करणाऱ्या नितीश राणाने अर्धशतकानंतर सुरिंदर हे नाव असलेली जर्सी दाखवली. नितीशने आपले अर्धशतक सासऱ्यांना समर्पित केले. नितीश राणाचे सासरे सुरिंदर मारवाह यांचे काही दिवसांपूर्वी कर्करोगामुळे निधन झाले. तर, दुसऱ्या सामन्याच्या आधी पंजाबचा फलंदाज मनदीप सिंगच्या वडिलांचे निधन झाले होते. व्हिडिओ कॉलवरून अंत्यसंस्काराला हजेरी लावल्यानंतर तो संघासाठी मैदानात उतरला. सचिनने या दोघांसाठी एक संदेश दिला.
सचिन ट्विटरवर म्हणाला, ''आपल्या जवळच्या माणासाच्या निधनाने वाईट वाटतेच, पण त्यांना शेवटचा निरोप देता आला नाही तर जास्त वाईट वाटते. मनदीप आणि नितीश या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती इश्वर देवो आणि महत्त्वाची बाब म्हणजे अशा परिस्थितीदेखील संघासाठी मैदानावर उतरल्याबद्दल दोघांना मी सलाम करतो.''
१९९९च्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिन इंग्लंडला असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. या घटनेनंतर तो मायदेशी परतला. त्यानंतर तो पुन्हा स्पर्धेत दाखल झाला आणि त्याने दमदार खेळी करत ती खेळी वडिलांना समर्पित केली होती.