रायपूर - रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या १५व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेड्स संघाने बांगलादेश लिजेड्स संघाचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिका लिजेड्सने उपांत्य फेरीत धडक दिली.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका लिजेड्स संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा २९ धावांवर असताना बांगलादेश लिजेड्स ने मेहरब हुसैनच्या (९) रुपाने आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर नजीमुद्दीन (३२), आफदाब अहमद (३९) आणि हनान सरकार (३६) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
बांगलादेश लिजेड्सचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना शेवटच्या षटकांमध्ये आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. यामुळे बांगलादेश लिजेड्सना कशीबशी १६० धावापर्यंत मजल मारता आली. आफ्रिकेकडून मकाया अँटिनी आणि शबाला यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर क्रुगर, जोंडेकी आणि डू ब्रूयन यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.
बांगलादेश लिजेड्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिका लिजेड्सच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरूवात केली. अॅन्ड्र्यू पुटिक आणि मॉर्ने व्हॅन विक यांनी १९.२ षटकांत संघाला विजय मिळवून दिला. पुटिकने ५४ चेंडूंत ९ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८२ तर मॉर्ने व्हॅन विकने ६२ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या.
दरम्यान, या मालिकेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लिजेड्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होईल.
हेही वाचा - ४९ चेंडूत नाबाद ७३ रन्स : विराट म्हणाला, 'या' खेळाडूशी चर्चा केल्याने सूर गवसला
हेही वाचा - भारत-इंग्लंड टी-२० मालिकेतील उर्वरित सामने प्रेक्षकांविना होणार