हैदराबाद - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर ११८ धावांनी विजय मिळविला. मोहम्मद नबी यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे बंगळुरूचा डाव कोसळला. त्याने ११ धावा देत ४ गडी बाद केल्याने बंगळुरूचा पराभव झाला.
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू पुढे विजयासाठी धावांचे २३२ आव्हान ठेवले होते. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने २० षटकात २ बाद २३१ धावा केल्या.प्रत्युत्तरात बंगळुरूला २० षटकात सर्वबाद ११३ धावा करता आल्या.
बंगळुरूकडून कॉलिन डी ग्रँडहोम याने सर्वाधिक ३७ धावा केल्या. संदीप शर्माने ३ गडी बाद करुन नबीला सुरेख साथ दिली. बंगळुरूचे ३ फलंदाज धावबाद झाले.
प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात पहिल्या गड्यासाठी १८५ धावांची विक्रमी भागीदारी केली. बेअरस्टो आणि वॉर्नर यांनी सुरुवातीपासूनच बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला चढविला.
जॉनीने ५६ चेंडूत ११४ धावा कुटल्या. त्यात १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. मैदानावर चौफेर फटकेबाजी करत बंगळुरूच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. डेव्हिड वॉर्नरनेही त्याला चांगली साथ दिली. त्याने ५५ चेंडूत १०० धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. बंगळुरूकडनू युझवेंद्र चहलला एकमेव गडी बाद करता आला.