नवी दिल्ली - भूतकाळातील गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाल्यास ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा सामना करायला आवडेल, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दिले आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला रोहितने हे उत्तर दिले.
मॅकग्रा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज आहे. त्याने 124 सामन्यांत 563 बळी घेतले आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने 381 बळी घेतले. अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसाठी ग्लेन मॅकग्राला ओळखले जात होते. 2007 च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
दुसरीकडे, रोहित शर्माने सर्व स्वरूपात भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्या विश्वकंरडक स्पर्धेत त्याने 9 सामन्यात 5 शतके आणि एक अर्धशतक केले. रोहितने या स्पर्धेत 648 धावा केल्या आणि या स्पर्धेच्या इतिहासात 5 शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहितने आतापर्यंत 224 एकदिवसीय सामने, 108 टी 20 आणि 32 कसोटी सामने खेळले आहेत.