नवी दिल्ली - सध्या भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. त्यानंतर विंडीजने दुसरा सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. आता अखेरचा निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ११ तारखेला रंगणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा 'क्लिन सेव्ह' करुन मैदानात उतरला होता.
दुसऱ्या सामन्यानंतर एका मजेशीर मुलाखतीत रोहितने या विषयी सांगितले की, 'माझी दाढी वाढलेली असेल, तर माझी मुलगी समायरा माझ्याशी खेळायला मागत नाही. ती माझ्या जवळ येत नाही. त्यामुळे मी तिच्यासाठी अखेर दाढी काढून टाकली.'
सामन्यानंतर कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि रोहित शर्मा हे तिघे मैदानावर धमाल करत होते. रोहित शर्मा त्या दोघांना रॅपिड फायर फेरीचे प्रश्न विचारत होता. त्याचे प्रश्न संपल्यानंतर चहलने रोहितला दाढी काढून टाकण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर रोहितने मुलगी समायरामुळे दाढी काढल्याचे सांगितले.
दरम्यान, रोहित शर्माला वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत सूर गवसलेला नाही. तो झालेल्या दोनही सामन्यात स्वस्तात बाद झाला. तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना वानखेडे स्टेडियमवर होणार असून रोहितचे हे होम ग्राऊंड आहे. यामुळं रोहितला या सामन्यात तरी सूर गवसणार का, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.