मुंबई - मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे क्रूर गोलंदाज आहेत. ते दोघेही संघाच्या सराव सत्रात बाऊंसरचा मारा करत, फलंदाजांचे डोके आणि शरीराला लक्ष्य करतात, असा खुलासा भारताचा हिटमॅन सलामीवीर रोहित शर्माने केला. रोहितने हा खुलासा एका ऑनलाईन शोमध्ये केला. तसेच त्याने, शमीच्या गोलंदाजीची शिकार भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधानाही ठरली, असल्याचेही सांगितलं.
रोहित शर्मा 'डबल ट्रबल विद जेमी अॅन्ड स्मृती शो' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यात भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज जेमिमा रोड्रिग्जने, रोहितला नेट सरावात कोणते गोलंदाज अडचणीत आणतात असा सवाल केला. यावर रोहितने सांगितले, 'मोहम्मद शमीसोबत मी २०१२-१३ पासून खेळत आहे. तो नेटमध्ये गोलंदाजी करणे पसंत करत नाही. पण तो जेव्हा नेट सरावात गोलंदाजीसाठी येतो. ते त्वेषाने मारा करतो. फलंदाजावर अजिबात दयामाया दाखवत नाही. शमी आणि बुमराह यांच्यात शर्यत लागलेली असते की कोण किती चेंडू बीट करेल. दोघे चेंडूने फलंदाजाच्या डोक्याला लक्ष्य करण्यासाठी प्राधान्य देतात. या दोघांच्या शर्यतीत फलंदाजाची गोची होते.'
पुढे बोलताना रोहित म्हणाला, 'शमी गवत असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे पसंत करतो. नेटच्या खेळपट्टीवर हिरवळ असतेच. तो नेट सरावाआधी बिर्याणी खाऊन येतो, तेव्हा तर वेगाने मारा करतो. शमीच्या गोलंदाजीचा अनुभव स्मृती मानधानाने घेतला आहे. एनसीएमध्ये स्मृती शमीच्या गोलंदाजीवर सराव करत होती. शमी त्यावेळी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकत होता. त्याने आधी सांगितलं होतं की, मी बॉडीलाईन गोलंदाजी करणार नाही. पण त्याने स्मृतीच्या शरीराला लक्ष्य केलं. यात स्मृतीला चेंडूला लागला. कित्येक दिवस चेंडू लागलेल्या ठिकाण काळेनिळे झाले होते.'
हेही वाचा - क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा वार्षिक करार : लाबुशेन 'इन' तर ख्वाजा 'आऊट', वाचा संपूर्ण लिस्ट
हेही वाचा - गेल पाठोपाठ रसेलने सीपीएलच्या फ्रँचायझीवर केले गंभीर आरोप, म्हणाला...