नवी दिल्ली - आगामी विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माही विश्वकरंडक स्पर्धेतील आपला फॉर्म कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रथम होणाऱ्या टी-२० मालिकेमध्ये रोहितला एक खास विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
भारताच्या या हिटमॅनला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या गेलचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. गेलने आत्तापर्यंत १०५ षटकार मारले आहेत तर रोहितने १०२ षटकार लगावले आहेत. भारतासोबत होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी गेलला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहितला हा विक्रम मोडता येऊ शकतो.
विंडीजचा स्फोटक फलंदाज म्हणून ख्याती असेलेल्या गेलने ५८ सामन्यात १०५ षटकार ठोकले आहेत. तर रोहितला १०२ षटकारांसाठी ९४ सामने खेळावे लागले आहे.
वेस्ट इंडीज आणि भारतीय संघात 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.